धनगर आणि लांडगा
एका धनगराला एक नुकतेच जन्मलेले लांडग्याचे पिल्लू मिळाले. ते त्याने आपल्या कुत्र्याच्या पिल्लांबरोबर वाढवले व मोठे केले.
याचा परिणाम असा झाला की ज्या ज्या वेळी एखादा लांडगा कळपातले मेंढरू पळवून नेई, तेंव्हा त्याचा पाठलाग करणा-या त्या धनगराच्या कुत्र्यांमध्ये तो पाळलेला लांडगा नेहमी सामील होई.
पण गंमत मात्र अशी की, त्या कळपावर दरोडा घालणा-या लांडग्याला न पकडताच परत येणे, त्या कुत्र्यांना कधी भाग पडले तर, त्यावेळी तो लांडगा तेवढा त्या दरोडेखोर इतर लांडग्याचा पाठलाग करी. अर्थात, धनगराचा लांडगाही शेवटी लांडगाच! त्या चोरीमध्ये नंतर तो इतर लांडग्यांशी गुपचूप भागीदारी करी. इतकेच नाही, तर बाहेरचे कोणी कळपातून मेंढरू न्यायला आले नाही तर, तो कळपांत वाढलेला लांडगा, स्वत:च गुपचूप एखादे मेंढरू ठार करी, व मेजवानीचा आनंद लुटी.
धनगर मात्र बेसावध होता. आणि मुख्य म्हणजे, त्या लांडग्यावर विश्वासून होता. एके दिवशी लांडग्याची बदमाशी धनगराच्या ध्यानी आली. आपण इतकी वर्षे पाळलेल्या व स्वत:च मोठे केलेल्या त्या लांडग्याला धनगराने एका झाडाला लटकावून फाशी दिले.
तात्पर्य – वाट्टेल ते प्रयत्न केले , तरी पाणी वळणावरच जाणार! दुष्टांचा नैसर्गिक दुष्टावा संस्काराने बदलून तो सज्जन होणे कधीच शक्य नाही.