विहिरीचे लग्न
एकदा बादशहा आणि बिरबल मध्ये खूप कडाक्याचे भांडण झाले. रागाच्या भरात बादशहा बिरबलाला म्हणाला तू राजधानी सोडून चालता हो. तुझी मला मुळीच गरज नाही.
बिरबल अतिशय स्वाभिमानी होता. तो ताबडतोब राजधानी सोडून निघून गेला आणि एका गावात वेश बदलून राहू लागला.
बरेच दिवस उलटून गेले तरी बिरबल राजधानी मध्ये परतला नाही. बादशाहला मात्र सारखी त्याची उणीव भासे, त्याची कामे अडून राहू लागली आणि त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे बादशाहला त्याच्या शिवाय करमत नव्हते. अन्न गोड लागत नव्हते. बादशाहाने अनेक प्रकारे बिरबलाचा शोध घेतला. परंतु बिरबल सापडत नव्हता.
बिरबलाला कसे शोधून काढावे यावर बादशाहने खूप विचार केला. बादशाहने बिरबलाच्या सहवासात बरेच दिवस घालवले होते. त्यामुळे बादशाहालाही त्याला शोधून काढण्याची युक्ती सुचली. त्याने प्रत्येक गावात दवंडी पिटली. राजवाड्यातील विहिरीचे लग्न करावयाचे आहे.
लग्न समारंभ थाटात होणार आहे. तरी प्रत्येक गावाच्या लोकांनी आपआपल्या विहिरीसह उपस्थित रहावे. जे उपस्थित राहणार नाही त्यांना जबरदस्त दंड केला जाईल. सर्व लोक चिंतेत पडले कुणालाच काही सुचेना.
बिरबल ज्या गावात राहत होता त्या गावातले लोकहि चिंतेत पडले होते. गावच्या पुढारींना या समस्येला कसे तोंड द्यावे समजत नव्हते. ठिकठिकाणी चर्चा सुरु झाल्या लोकांची मते घेतली जाऊ लागली. अशाच एका सभेला शेतकऱ्याचा वेश घेतलेला बिरबल हजर होता. त्याने गावकरींना जाण्याची युक्ती सांगितली.
गावकरी खुश झाले. एक दिवस गावातील पाच-सहा प्रमुख पुढारी उंची वस्त्रे घालून दिल्लीला गेले. दरबारात बादशहा पुढे हात जोडून ते म्हणाले, “खाविंद आपल्या आज्ञेप्रमाणे आणि निमंत्रण स्वीकारून आपल्या राजवाड्यातील विहिरीच्या लग्नाला आमच्या गावाच्या झाडून सर्व विहिरींना घेवून आम्ही हजर झालो आहोत.”
आमच्या गावच्या विहिरी वेशी बाहेर थांबल्या आहेत. तेव्हा आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे राजधानीतील काही प्रमुख विहिरींना त्यांचे स्वागत करण्यासाठी वेशी पर्यंत पाठवावे. त्याचे बोलणे ऐकून बादशहा जोरात हसला आणि ओरडला, बिरबल सापडला!
बादशहा म्हणाला, अजून पर्यंत एकही गावाचे लोक राजधानीत आले नाही. तुम्हीच प्रथम हजर झाला. तुम्हाला हि युक्ती कोणी सांगितली?
“एका शेतकऱ्याने महाराज!”, गावकऱ्यांनी नम्र पने उत्तर दिले. तो शेतकरीच माझा बिरबल आहे. बादशाच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. ताबडतोब त्याने माणसांबरोबर लवाजम्यासहित काझीला पाठवले. बिरबलला राजधानीत सन्मानाने आणण्याचा हुकुम दिला.
बिरबल बादशाच्या महालात आला आणि त्याने बिरबलाला मिठी मारली.