अकबर बादशहाला रोज विडा खाल्ल्याशिवाय चैन पडत नसे. विशेषतः शौकतअलीने तयार केलेले पान त्याला खूपच आवडायचे. तो नेहमी शौकतअलीचे या गोष्टीसाठी कौतुक करी. त्यावेळीं जाड्या शौकतअली बादशहाला अगदी वांकून सलाम करीत असे.
तो म्हणाचा, ‘‘मी या कलेत पारंगत झालो, कारण माझ्या वडिलांनी ही विद्या मला शिकवली. वयाच्या आठव्या वर्षापासून मी पान लावतो आहे. ते आपल्या पसंतीला उतरते, हे माझे परमभाग्य आहे. माझ्या अंगांगात ही कला भिनली आहे. आणि आपल्याकडून तिचे कौतुक झाल्याने मी धन्य झालो आहे.’’
बादशहा अकबर कुठेही जाताना शौकतअलीला आपल्याबरोबर घेऊन जायचे. जेवणानंतर ते हमखास पान खात असत. अशीच तीन वर्षे गेली.
एके दिवशी शौकतअलीच्या हातून पानांत चुना थोडा जास्त पडला. बादशहाने ते पान खाल्ल्यावर त्याची जीभ भाजली.
त्यामुळे पान थुंकून देत तो म्हणाला, ‘‘तुझे पान खाल्ल्याने माझी जीभ भाजली. विडा करण्यात माझा हात कोणीही धरू शकणार नाही, असे म्हणत असतोस. त्यावेळी तुला लाज वाटली नाही?’’
शौकतअली भीतीने थरथर कांपू लागला.
आपली भाजलेली जीभ सारखी बघत बादशहा म्हणाला, ‘‘शौकतअली, आत्ताच्या आत्ता जाऊन तुझी पिशवी भरून चुना आण. समजलं?’’
या अपराधासाठी बादशहा आपल्याला तुरूंगात टाकतील कीं आपला शिरच्छेद करतील, असा विचार करीत शौकत दुकानांत गेला.
पिशवी चुन्याने भरल्यानंतर दुकानदाराने विचारले, ‘‘एवढा चुना कां नेतोस?’’
‘‘मलाही माहित नाही. बादशहाने मागवला आहे.’’ नेमका त्याच वेळी महेशदास तिथे आला. त्याने विचारले, ‘‘बादशहांनी इतका चुना कां मागवला आहे?’’
पिशवी चुन्याने भरल्यानंतर दुकानदाराने विचारले, ‘‘एवढा चुना कां नेतोस?’’
‘‘मलाही माहित नाही. बादशहाने मागवला आहे.’’ नेमका त्याच वेळी महेशदास तिथे आला. त्याने विचारले, ‘‘बादशहांनी इतका चुना कां मागवला आहे?’’
‘‘बादशहांनी अशी आज्ञा कां केली, ते मलाही समजत नाही’’ शौकतअली दीनवाण्या स्वरांत म्हणाला.
‘‘बादशहांनी यापूर्वीं कधी अशी आज्ञा केली होती कां?’’ महेशदासने विचारले.
शौकतअली म्हणाला, ‘‘कधीच नाही.’’
‘‘मग एक काम कर. भरपेट तूप पिऊन जा.’’ महेशने उपाय सांगितला.
‘‘आधीच मी जाड्य़ा, त्यांत माझे पोट सुटलेले आहे. तूप पिऊन जायला सांगून माझी खिल्ली उडवता कीं काय?’’ शौकतने विचारले.
‘‘मी तुझी खिल्ली उडवत नाही. तुझ्या चांगल्यासाठी सांगतो आहे. बादशहांच्या समोर जाण्यापूर्वी पोटभर तूप अवश्य पी. असे केल्यानेच तुझा प्राण वाचेल. मला आता लवकर निघायला हवे’’ असे म्हणून महेशदास तेथून निघाला.
शौकतअली विचारांत पडला. चुन्याची पिशवी घेऊन घरी आला आणि बायकोकडून तूप मागवले. मग ते पोटभर प्यायला.
‘‘हे काय करताहात? असे बायकोने विचारले. तो कांही न बोलताच घाईने बाहेर पडला आणि बादशहांसमोर हजर झाला.
त्याच्याकडे न पहाताच ‘‘आलास?’’ असे म्हणून बादशहाने एका दरबार्याला सांगितले, ‘‘याला बाहेर घेऊन जा व तो चुना खायला घाल.’’
‘जहापन्हां, सगळा चुना खाल्ला तर मी मरेन. चुना पोट जाळतो’’ असे म्हणून शौकत रडू लागला.
‘‘हीच तुझी शिक्षा आहे’’ अकबर बादशहा गंभीरपणे म्हणाला. दरबारी त्याला बाहेर घेऊन आला व त्याला चुना खाण्याची आज्ञा केली.
राजाज्ञेचे उल्लंघन कसे करणार? म्हणून दोन्ही मुठी भरून चुना त्याने खाल्ला. आणि तेवढा चुना खाऊनच तो बेशुद्ध पडला. इतक्यांत, बादशहा तेथे आले व शौकतला पाहून म्हणाले, ‘‘अजून हा जिवंत आहे?’’
महत्प्रयासाने अली उठला व म्हणाला, ‘‘तूप प्यायल्यामुळे वाचलो, खाविंद.’’
‘‘तूप कां प्यायलास?’’ बादशहाने विचारले.
‘‘मी चुना खरेदी करत असताना महेशदास नांवाचा एक तरुण तेथे आला व त्याने सल्ला दिला कीं, तूप पिऊन महाराजांसमोर जा. बरे झाले, मी त्याचे ऐकले’’ शौकत म्हणाला.
‘‘तो महेशदास कोठे आहे? लवकर जा आणि त्याला माझ्याकडे घेऊन ये’’ अकबराने हुकूम केला.
थोड्य़ाच वेळांत शौकतअली महेशदासला घेऊन तेथे आला. त्याला पहाताच बादशहा म्हणाला, ‘‘छान बिरबल, तर हे तुझे काम आहे. शौकतअलीला तूप प्यायला कां सांगितलेस?’’
‘‘शौकतअलीने तूप पिऊन येऊ नये, अशी कांही आपली आज्ञा नव्हती. खाविंद, माफ करा. आपण अलीला पिशवीभर चुना आणण्याची आज्ञा केलीत. तेव्हांच मला अंदाज आला कीं, आपण त्याला शिक्षा देण्यासाठीच ही आज्ञा केली आहे. म्हणूनच मी त्याला तूप पिऊन येण्याचा सल्ला दिला. नाहीतर तो लगेचच मरण पावला असता’’ बिरबल म्हणाला.
‘‘तो मेला असता तर तुझे काय बिघडले? जास्त चुना घालून याने माझ्या जिभेला चटका दिला. त्याला शिक्षा झालीच पाहिजे.’’ अकबर म्हणाला.
‘‘शौकतअलीच्या मृत्यूने माझे कांहीच बिघडले नसते. त्यामुळे आपलेच नुकसान झाले असते. गेली तीन वर्षे तो आपल्या सेवेत आहे. आपण मला कित्येक वेळा सांगितले आहे कीं, त्याने तयार केलेले पान उत्तम असते. अशी व्यक्ती मरण पावली तर सर्वोत्तम पानवाला कसा मिळेल? तो आपल्यावर अवलंबून आहे. माणसाच्या हातून सहज चूक घडूं शकते. अनवधानाने झालेली चूक माफ करणे, हेच आपल्यासारख्या बादशहालाच शोभते’’ बिरबल म्हणाला. शौकत अलीने वांकून पुन्हां मुजरा केला.
ते पाहून बादशहा म्हणाला, ‘‘वांकून जमिनीला डोके टेकवायला सांगितले असते, तर बरे झाले असते. तीच तुझ्यासाठी योग्य शिक्षा ठरली असती.’’
नंतर क्षणार्धाने बादशहा अकबर हंसून अलीला म्हणाला, ‘‘ठीक आहे. जे झाले, ते झाले. ताबडतोब आम्हा दोघांसाठी उत्तम पान तयार करून दे.’’