लिलाव | कुसुमाग्रज कविता

लिलाव | कुसुमाग्रज कविता

उभा दारी कर लावुनी कपाळा
दीन शेतकरी दावुनी उमाळा,
दूत दाराशी पुकारी लिलाव,
शब्द कसले ते-घणाचेच घाव !
पोसलेले प्राशून रक्त दाणे
उडुनि जाती क्षणी पाखरांप्रमाणे
निघत मागुनि वाजले आणि थाळि,
गाडग्यांची ये अखेरीस पाळी !
वस्तुवस्तूवर घालुनिया धाड
करित घटकेतच झोपडे उजाड
स्तब्ध बाजूला बसे घरधनीण
लाल डोळ्यातिल आटले उधाण
भुके अर्भक अन् कवळुनी उरास
पदर टाकुनि त्या घेइ पाजण्यास
ऊर उघडे ते तिचे न्याहळोनी
थोर थैलीतिल वाजवीत नाणी
‘आणि ही रे !’ पुसतसे सावकार,
उडे हास्याचा चहुकडे विखार


कवी – कुसुमाग्रज

1 thought on “लिलाव | कुसुमाग्रज कविता”

  1. गुणवत्ता माजलेली सावकाराची माणसं नोकर आणि दिनवना गरीब विचारा शेतकरी त्याची बायको आणि अशक्त अमोल यांचं वर्णन करणारी विषारी विखारी कविता

    Reply

Leave a Comment