दूर मनोर्यात | कुसुमाग्रज कविता
वादळला हा जीवनसागर – अवसेची रात
पाण्यावर खळबळा लोळतो रुसलेला वात
भांबावुनी आभ्रांच्या गर्दित गुदमरल्या तारा
सुडाने तडतडा फाडतो उभे शीड वारा
पिंजुनिया आयाळ गर्जती लाटा भवताली
प्रचंड भिंगापरी फुटते जळ आदळुनी खाली
प्रवासास गल्बते आपुली अशा काळरात्री
वावटळीतिल पिसांप्रमाणे हेलावत जाती
परन्तु अन्धारात चकाके बघा बंदरात
स्तम्भावरचा प्रकाश हिरवा तेजस्वी शांत
किरणांचा उघडून पिसारा देवदूत कोणी
काळोखावर खोदित बसला तेजाची लेणी
उज्ज्वल त्याची पहा प्रभावळ दूर मनोर्यात
अन् लावा ह्रुदयात सख्यांनो आशेची वात
कवी-कुसुमाग्रज