दरबाराचे कामकाज चालू होते. राज्यकारभार चालविण्याच्या दृष्टिने महत्वाचे काय या एका प्रश्नावर सर्वजण चर्चा करत होते . सर्वजण एक एक करून आपले मत व्यक्त करत होते. अकबर दरबारात बसून हे सर्व ऐकत होता व त्याला असे जाणवले की सर्वांचे म्हणणे वेगवेगळे आहे. त्यांना आश्चर्य वाटले की सर्व एकसारखेच विचार का करत नाही!
अकबरने बिरबलला विचारले, ‘तू मला सांगू शकतो का, की लोकांमधील प्रत्येकाचे मत आपापसात का मिळत नाही? सगळे वेगवेगळया पध्दतीने विचार का करतात?’
‘प्रत्येक वेळेस असे होत नाही, महाराज!’ बिरबल बोलला, ‘काही समस्या अशा असतात की ज्यावर सर्व एकसारखे विचार करतात.’ यानंतर कामे आटोपून दरबारातील कार्यवाही समाप्त झाली व सगळे आपापल्या घरी निघून गेले.
त्या संध्याकाळी अकबर आणि बिरबल बागेत फिरत होते, तेव्हा अकबरने पुन्हा सकाळचा प्रश्न बिरबलला केला व त्याबद्दल निरसन करायला सांगितले. त्यानंतर बिरबलने बागेत एका कोपऱ्यात बोट करून सांगितले की , ‘त्या तिथे झाडाजवळ एक विहीर आहे तिथे चला, मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतो की जेव्हा लोकांशी निगडीत काही समस्या असतात तेव्हा सर्वजण एकसारखाच विचार करतात. माझे म्हणणे असे आहे की अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्यावर लोकांचे विचार एकसारखेच असतात.’
अकबरने विहीरीजवळ काहीवेळ बघितले व बोलला, ‘परंतु मला काहीही समजले नाही, तुझी समजवण्याची पध्दत जरा वेगळीच आहे.’ अकबरलाही माहीत होते की बिरबल आपले म्हणणे सिध्द करण्यासाठी असेच काहीतरी प्रयोग करत असतो.
‘सर्व काही समजेल महाराज!’ बिरबल बोलला.‘आपण राजकीय आदेश जाहीर करा की येत्या पौर्णिमेला राज्यातील प्रत्येक घरातून एक तांब्या दूध बागेत असलेल्या विहीरीत आणून टाकले जावे. आपले राज्य खूप मोठे आहे, जर प्रत्येक घरातून एक तांब्या दूध या विहीरीत पडले तर ही विहीर दूधाने भरून जाईल.’
बिरबलचे हे बोलणे ऐकून बादशहा अकबर जोरजोरात हसू लागला. तरीपण त्याने बिरबलने सांगितल्याप्रमाणे राजआदेश काढला. पूर्ण राज्यात दवंडी पिटवली गेली की, ‘येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक घरातून एक तांब्या दूध शाही बागेतील विहीरीत आणून टाकावे. जो असे करणार नाही त्याला शिक्षा दिली जाईल.’
पौर्णिमेच्या दिवशी बागेच्या बाहेर लोकांच्या रांगा लागल्या होत्या. या गोष्टीवर विशेष लक्ष ठेवले गेले की प्रत्येक घरातून एक तरी व्यक्ती आलेली आहे. सर्वांच्या हातात भरलेले भांडे दिसत होते.
अकबर आणि बिरबल लांब बसून हे सर्व काही बघत होते आणि एकमेकांकडे बघून हसत होते. संध्याकाळ होण्याच्या आधी विहीरीमध्ये दूध टाकण्याचे काम पूर्ण झाले होते. प्रत्येक घरातून दूध आणून विहीरीत टाकले गेले होते.
जेव्हा सर्व लोक तिथून निघून गेले तेव्हा अकबर व बिरबल दोघेही विहीरीजवळ गेले व विहीरीमध्ये त्यांनी डोकवून बघितले. विहीर काठोकाठ भरलेली होती. परंतु विहीर दूधाच्या ऐवजी पाण्याने भरलेली होती हे बघून अकबर चकित झाला.
हैराण झालेल्या नजरेने अकबरने बिरबलकडे बघत विचारले, ‘असे का झाले? शाही आदेश तर विहीरीत दूध टाकण्याचा निघाला होता, परंतु हे पाणी कुठुन आले? लोकांनी दूध का नाही टाकले?’ बिरबल जोरात हसून बोलला, ‘हेच मला सिध्द करायचे होते महाराज! मी तुम्हाला सांगितले होते ना की बऱ्याच अशा गोष्टी असतात ज्यावर लोक एकसारखा विचार करतात. हे पण त्याचेच एक उदाहरण होते. लोक बहुमूल्य दूध वाया घालवायला तयार नव्हते त्यांना माहीत होते की विहीरीत दूध टाकणे व्यर्थ आहे त्यामुळे त्यातून त्यांना काही मिळणार नाही. त्यामुळे विहीरीत दूधाऐवजी पाणी टाकले तर कोणालाही समजणार नाही असा विचार त्यांनी केला व सर्वांनी दूधाऐवजी पाणीच विहीरीत ओतले. याचा परिणाम दूधाच्या ऐवजी विहीर पाण्याने भरली.’
बिरबलची चतुराई बघून अकबरने त्याची पाठ थोपटली. बिरबलने सिध्द करून दाखविले की कधी कधी लोकं एकसारखाच विचार करतात.