सिंह आणि उंदीर

सिंह आणि उंदीर मराठी बालकथा

सिंह महाराज आपल्या गुहेबाहेर ऊन खात बसले होते. तेवढ्यात एक उंदीर त्यांच्या अंगावर चढून खेळू लागला. महाराजांना राग आला. त्यांनी उंदराला पंज्यात पकडले. आता मात्र उंदीर घाबरला. गयावया करु लागला. ‘महाराज मला सोडा, मी पुढेमागे आपल्या उपकारांची फेड करेन’ असे म्हणू लागला. महाराज हसले. म्हणाले, ‘मी या जंगलचा राजा. तू इटुकला पिटुकला. मला काय मदत करणार?’ उंदीर आणखीच काकुळतीला आला. महाराजांना शेवटी दया आली आणि उंदराला अभय दिले.

वर्षा मागून वर्षे उलटली. राजेशाही जाऊन जंगलात लोकशाही आली. लोकशाही म्हणजे ओघाने निवडणूक आलीच. जोरदार निवडणूक झाली. महाराजांच्या पक्षानेही सगळ्या जागा लढवल्या. मात्र बहुमत कुणालाच मिळाले नाहि. सत्ता हातची जाणार की काय याचीच चिंता महाराजाना लागून राहिली. विरोधकांनीही जाळं जोरदार विणले होते.

एवढ्यात त्यांना फोन आला. “महाराज मी उंदीर बोलतोय. काही वर्षांपूर्वी तुम्ही मला अभय दिले होते. आज त्या उपकारची फेड करायची वेळ आलेय. या निवडणुकीत मी अपक्ष म्हणून निवडून आलोय. जर योग्य मोबदला मिळाला तर मी बाकी अपक्षांचा पाठींबाही तुम्हाला मिळवून देतो.”

अशा रीतीने महाराजांभोवती विरोधकांनी विणलेल्या जाळयातून महाराज सही सलामत बाहेर पडले.

Leave a Comment