Marathi Stories For kids || मराठी बालकथा

Marathi Stories For kids || मराठी बालकथा :- मित्रांनो आज या पोस्ट मध्ये आम्ही काही Marathi Stories For kids मराठी बालकथा देत आहोत.आशा आहे कि हे तुम्हाला नक्कीच आवडतील.

एकीचे बळ

वाराणसीलगत एका गावातील एक सुतार रोज जंगलात जात असे.
एकदा त्याने खड्डय़ात पडलेल्या जंगली कुत्र्याच्या पिल्याचा जीव वाचवला तेव्हापासून त्याला त्या पिलाचा लळा लागला. ते पिलू त्याला तेथे भेटत होते. ते पाहून इतरही जंगली कुत्रे त्याच्याजवळ येत असत. परंतु त्यांना सर्वाना एका वाघाने फार त्रस्त करून सोडले होते. तो रोज त्यांच्यावर हल्ले करत होता. सुताराने एक योजना बनविली. नेहमीप्रमाणे वाघ डोंगराच्या माथ्यावर आला.

सर्व कुत्री वेगवेगळ्या ठिकाणी थांबून त्याच्यावर भुंकू लागली. वाघाने चवताळून एका कुत्र्यावर झेप घेतली तसा तो कुत्रा खाली बसला. वाघाची उडी थेट त्या कुत्र्याच्या मागे असणार्‍या एका मोठय़ा खड्डय़ात पडली. सगळ्या कुत्र्यांनी त्याच्यावर धाव घेतली व त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार केले.

तात्पर्य : एकीचे बळ मोठे असते.


खरी कमाई

धन्नाशेटचा मुलगा राम अगदीच आळशी. घरांत गडगंज संपत्ती. एकुलता एक लाडाचा. काम कधी करावंच लागलं नाही. आता २१ वर्षाचा झाला. शेठजींना काळजी पडली. याचे कसे होणार साठलेला पैसा किती दिवस पुरेल. दुसरे दिवशी त्यांनी मुलाला बोलावले व म्हणाले हे बघ आज तू सकाळीच बाहेर जा. काहींतरी काम करून पैसे मिळवुन आण तरच तुला जेवायला मिळेल’ मुलाला काहीच कळेना. तो बहिणीकडे गेला तिने त्याला एक रूपया दिला. शेठजींनी तो विहीरीत फेकून दिला. दुसर्‍या दिवशी आईकडून घेतला तिसर्‍या दिवशी मात्र कोणीही पैसे द्यायचे नाहीत हे उमजल्यावर स्वारी घराबाहेर पडली स्वारी घराबाहेर काम शोधायला निघाली. पण काय काम करणार ? बारा वाजे पर्यंत हिंडला. काम मिळेना. पोटात कावळे कोकलायला लागले. स्टेशनवरून एक जड बॅग घेऊन येणारा माणूस दिसला त्याला हमाल हवा होता. हा धावत पुढे गेला. ‘साहेब, इकडे आणा’. ती बॅग त्याने डोक्यावर उचलली. घामाघूम झाला. साहेबांनी आठ आणे हातावर ठेवले. घरी आला. शेठजींच्या हातावर आठ आणे ठेवले.

दोनदिवसाप्रमाणेच शेठजींनी ते विहीरीत फेकले हा चवताळून उठला. ‘बाबा अहो तेवढे आठ आणे मिळवायला मला किती वणवण करावी लागली आणि तुम्ही ते फेकून दिलेत ?’ शेठजींनी त्याला जवळ घेतले. पाठीवरून हात फिरवला, ‘बाळा आता मला काहीं काळजी नाहीं कारण खर्‍या कष्टाची किंमत तुला आज कळली. दोन दिवस ह्याच्या दुप्पट रक्कम फेकली पण तुला राग आला नव्हता कारण त्या मागे कष्ट नव्हते.’ स्वकष्टाची कमाई तीच खरी कमाई.


हे पण वाचा
अकबर बिरबल मराठी कथा
पंचतंत्र मराठी कथा
दोन सापांची पंचतंत्र कथा
हत्ती आणि सशाची पंचतंत्र कथा
राजा आणि मूर्ख माकड पंचतंत्र कथा
व्यापारी आणि उंट


मिता

मिता कोकणातल्या छोटया खेड्यात रहायची. तिचे गाव शांत, सुंदर आणि समुद्राकाठी वसलेले होते. तिचे बाबा मासळी विकायचे आणि आई घरी पापड, लोणची करुन विकायची. ह्यावर त्यांच्या कुटूंबाचा उदर निर्वाह चालत असे. रोज सकाळी पहाटे उठून मिताही त्यांच्या बरोबर समुद्र किनारी जात असे. तिला सकाळच्या उन्हात चमकणारी समुद्राची वाळू खूप आवडत असे. वाळूत ती अनेक प्रकारची नक्षी काढत असे. समुद्रातले अनेक रंगी मासेही तिला खूप आवडत असत.

तिचे बाबा मासे पकडत तेंव्हा जाळ्यात अडकलेल्या माश्यांची तडफड तिला अस्वस्थ करुन जात असे. तिने एक दिवस तिच्या बाबांना विचारले,” बाबा, आपल्या सारखेच सगळ्यांनी रोजच मासे पकडले तर समुद्रातले मासे एक दिवस संपून जातील? मग सगळ्यांनी बाजारात जाऊन विकायचे काय आणि खायचे काय?” मिताच्या ह्या प्रश्नावर आई-बाबा दोघांनाही हसू आले.

त्या दिवशी रात्री मिताच्या आईला अस्वस्थ करणारे स्वप्न पडले. तिने स्वप्नात पाहिले की समुद्रातले सगळे मासेच संपून गेले आहेत. त्यामुळे त्यांना पैसे मिळणेच कठीण झाले आहे. आईने मिताच्या बाबांनाही हे स्वप्न सांगितले. दुसर्‍या दिवशी सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे समुद्रावर जाण्याची तयारी झाली. मिताने बघितले की तिच्या आईने मासे ठेवण्याच्या नेहमीच्या टोपलीपेक्षा आकाराने लहान टोपली घेतली होती. तिला काही कळले नाही पण न विचारताच ती शाळेत गेली.

आल्यावर मिताने बघितले तर तिचे बाबा नारळाच्या झावळ्या करत होते. आई पापड करण्यात गुंग होती. आज दोघेही जण मासळी बाजारातून लवकर घरी आले होते. मिताने त्याबद्दल विचारताच आई म्हणाली,” मिता तुझ्या प्रश्नाने आम्हाला विचार करायला भाग पाडले आहे. आजपासून आम्ही ठरवले आहे की आवश्यकते नुसारच आपल्याला जितके मासे हवेत तितके मासे घ्यायचे. अधिक घेण्याचा हव्यास करायचा नाही. त्यामुळे आपला खर्च भागवण्यासाठी आम्ही इतरही उद्योग करायचे ठरवले आहेत. पण त्यासाठी निसर्गाची हानी मात्र अजिबात करायची नाही.” आईचे बोलणे ऐकून मिताने तिला अत्यानंदाने मिठी मारली.

Marathi Stories For kids


शिकारी

एक शिकारी एकदा शिकार करण्यासाठी रानात गेला. त्याने बरेच कुत्रे स्वतःबरोबर घेतले होते. परंतु ते आपल्या मर्जीप्रमाणे इकडेतिकडे पळू नयेत म्हणून त्याने दोन दोन कुत्रे जोडीने एका साखळीने बांधले. त्यांपैकी वाघ्या व पाग्या या नावाच्या दोन कुत्र्यांची एक जोडी होती. ते एकमेकांवर प्रेम करीत असत. ते नेहमी बरोबर खात-पित, नेहमी एकत्र खेळत असत. तेव्हा ते चांगले काम करतील असे त्या शिकार्‍याला वाटले. पण थोड्या वेळाने पाहतो तर वाघ्या पुढे ओढ घेत असता पाग्या मागे राहू लागला व पाग्याने एका दिशेने ओढ घेतली की वाघ्याने उलट दिशेने घ्यावी असे होऊ लागले. शेवटी दोघेही एकमेकांचे लचके तोडण्याच्या बेतात आले. ते पाहून एक म्हातारा कुत्रा त्यांना म्हणाला, ‘मूर्खांनो, तुम्ही दोघांनी थोडी पड घेतली तर भांडणाची वेळ का येईल ? मी आणि माझा सोबती नेहमी एकमेकांच्या मर्जीप्रमाणे वागत असूं, त्यामुळे आमच्यावर कधीही भांडण्याचा प्रसंग आला नाही.’

तात्पर्य – एकत्र राहावयाचे असेल तर सर्वांनी एकमेकांच्या सोयी पाहाव्या लागतात.


धनगर आणि  लांडगा

एका धनगराला एक नुकतेच जन्मलेले लांडग्याचे पिल्लू मिळाले. ते त्याने आपल्या कुत्र्याच्या पिल्लांबरोबर वाढवले व मोठे केले.

याचा परिणाम असा झाला की ज्या ज्या वेळी एखादा लांडगा कळपातले मेंढरू पळवून नेई, तेंव्हा त्याचा पाठलाग करणा-या त्या धनगराच्या कुत्र्यांमध्ये तो पाळलेला लांडगा नेहमी सामील होई.

पण गंमत मात्र अशी की, त्या कळपावर दरोडा घालणा-या लांडग्याला न पकडताच परत येणे, त्या कुत्र्यांना कधी भाग पडले तर, त्यावेळी तो लांडगा तेवढा त्या दरोडेखोर इतर लांडग्याचा पाठलाग करी. अर्थात, धनगराचा लांडगाही शेवटी लांडगाच! त्या चोरीमध्ये नंतर तो इतर लांडग्यांशी गुपचूप भागीदारी करी. इतकेच नाही, तर बाहेरचे कोणी कळपातून मेंढरू न्यायला आले नाही तर, तो कळपांत वाढलेला लांडगा, स्वत:च गुपचूप एखादे मेंढरू ठार करी, व मेजवानीचा आनंद लुटी.

धनगर मात्र बेसावध होता. आणि मुख्य म्हणजे, त्या लांडग्यावर विश्वासून होता. एके दिवशी लांडग्याची बदमाशी धनगराच्या ध्यानी आली. आपण इतकी वर्षे पाळलेल्या व स्वत:च मोठे केलेल्या त्या लांडग्याला धनगराने एका झाडाला लटकावून फाशी दिले.

तात्पर्य – वाट्टेल ते  प्रयत्न केले , तरी पाणी वळणावरच जाणार! दुष्टांचा नैसर्गिक दुष्टावा संस्काराने बदलून तो सज्जन होणे कधीच शक्य नाही.


सिंह आणि उंदीर मराठी बालकथा

सिंह महाराज आपल्या गुहेबाहेर ऊन खात बसले होते. तेवढ्यात एक उंदीर त्यांच्या अंगावर चढून खेळू लागला. महाराजांना राग आला. त्यांनी उंदराला पंज्यात पकडले. आता मात्र उंदीर घाबरला. गयावया करु लागला. ‘महाराज मला सोडा, मी पुढेमागे आपल्या उपकारांची फेड करेन’ असे म्हणू लागला. महाराज हसले. म्हणाले, ‘मी या जंगलचा राजा. तू इटुकला पिटुकला. मला काय मदत करणार?’ उंदीर आणखीच काकुळतीला आला. महाराजांना शेवटी दया आली आणि उंदराला अभय दिले.

वर्षा मागून वर्षे उलटली. राजेशाही जाऊन जंगलात लोकशाही आली. लोकशाही म्हणजे ओघाने निवडणूक आलीच. जोरदार निवडणूक झाली. महाराजांच्या पक्षानेही सगळ्या जागा लढवल्या. मात्र बहुमत कुणालाच मिळाले नाहि. सत्ता हातची जाणार की काय याचीच चिंता महाराजाना लागून राहिली. विरोधकांनीही जाळं जोरदार विणले होते.

एवढ्यात त्यांना फोन आला. “महाराज मी उंदीर बोलतोय. काही वर्षांपूर्वी तुम्ही मला अभय दिले होते. आज त्या उपकारची फेड करायची वेळ आलेय. या निवडणुकीत मी अपक्ष म्हणून निवडून आलोय. जर योग्य मोबदला मिळाला तर मी बाकी अपक्षांचा पाठींबाही तुम्हाला मिळवून देतो.”

अशा रीतीने महाराजांभोवती विरोधकांनी विणलेल्या जाळयातून महाराज सही सलामत बाहेर पडले.


मित्रांनो हि -Marathi Stories For kids || मराठी बालकथा जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद
इतर मराठी कथा वाचण्यासाठी येथे क्लीक करा : मराठी कथा

Leave a Comment