तेनाली राम मराठी कथा || Tenali Raman Stories In Marathi

Tenali Raman Stories In Marathi || तेनाली राम मराठी कथा:- तेनाली राम यांचा जन्म 16 व्या शतकातील आंध्र प्रदेश राज्यातील गुंटूर जिल्ह्यातील गरलापाडू या खेड्यात झाला. तेनालीराम यांचा जन्म तेलगु ब्राह्मण कुटुंबात झाला. ते व्यवसायाने कवी होते, आणि तेलगू साहित्याचे उत्तम जाणकार होते. ते आपल्या युक्तीसाठी प्रसिध्द होते . आणि त्यांना “विकट कवि” या टोपण नावाने संबोधित केले जात होते. तेनालीराम यांचे वडील गारलपती रामाय्या तेनाली गावात रामलिंगेश्वरस्वामी मंदिराचे पुजारी होते.

महाराज कृष्णदेव राय – 1509 ते 1529 या काळात विजयनगरच्या सिंहासनावर विराजमान होते, तेव्हा तेनालीराम हास्यकवी आणि मंत्री सहाय्यक म्हणून त्याच्या दरबारात हजेरी लावत असत. इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार, तेनालीराम हास्यकवी तसेच एक जाणकार व हुशार व्यक्तिही होते. अनेक वेळा महाराज कृष्णादेव रायाला तेनालीराम राज्यातील भयंकर त्रासातून मुक्त होण्यासाठी मदत करीत असत. त्यांच्या बौद्धिक युक्ती आणि ज्ञानाशी संबंधित बऱ्याच कथा आहेत, त्यापैकी काही निवडक कथा-Tenali Raman Stories In Marathi खाली सांगितल्या आहेत.

Tenali Raman Stories In Marathi


कंजूष व्यापारी

राजा कृष्णदेवराय यांच्या राज्यात एक कंजूस व्यापारी रहात होता. त्याच्याजवळ पैशांची कमतरता नव्हती, पण खिशातून एक पैसा पण काढताना त्याच्या अतिशय जीवावर येत असे. एकदा त्याच्या काही मित्रांनी त्याला एका चित्रकाराकडून त्याचे स्वःताचे चित्र बनविण्यास तयार केले. तेव्हा तो तयार झाला परंतु जेव्हा तो चित्रकार त्याचे चित्र बनवून घेऊन आला तेव्हा त्या व्यापाऱ्याची इच्छा होत नव्हती, की मूल्य स्वरूपात त्या चित्रकाराला शंभर सुवर्णमुद्रा दयाव्यात.

तो व्यापारी पण एक कलाकारच होता. चित्रकाराला येत असलेले बघून व्यापारी घरात गेला व काही वेळातच आपला चेहरा बदलून बाहेर आला त्याने चित्रकाराला सांगितले, ‘तू काढून आणलेले चित्र जरापण चांगले नाही, तूच सांग तू काढून आणलेल्या चित्रातील चेहरा माझ्या चेहऱ्याशी जरा पण मिळतो का?’ चित्रकाराने बघितले खरोखरच व्यापाराचा चेहरा व चित्रातील चेहरा वेगळा आहे. तेव्हा व्यापारी बोलला ‘जेव्हा तू असे चित्र बनवून आणेल की जे माझ्या चेहऱ्याला मिळते जूळते आहे, तेव्हाच मी तू आणलेले चित्र विकत घेईन.’ पुढे दुसऱ्या दिवशी चित्रकार आणखी एक चित्र बनवून आणतो जो हुबेहूब व्यापाऱ्याच्या चेहऱ्याशी मिळतो, जो पहिल्या दिवशी व्यापाऱ्याने बनविला होता. हया वेळेला पुन्हा व्यापाराने आपला चेहरा बदलला व चित्रकाराच्या चित्रामध्ये चुका काढू लागला. चित्रकार खूप अपमानित झाला त्याला हे समजत नव्हते की या प्रकारच्या चुका त्याच्या चित्रात का होत आहेत?

दुसऱ्या दिवशी तो आणखी एक चित्र बनवून घेवून आला, त्याच्याबरोबर पुन्हा तेच घडले. आता त्याला व्यापाऱ्याचा दुष्टपणा समजला होता. त्याला माहिती होते की व्यापारी कंजूस आहे, तो आपल्याला पैसे देणारी नाही. परंतु, चित्रकार आपल्या इतक्या दिवसांची मेहनत पण वाया जाऊ देणार नव्हता. खूप विचार केल्यानंतर चित्रकार तेनालीरामकडे गेला आणि त्याला आपली समस्या सांगितली.

काही वेळ विचार केल्यानंतर तेनालीराम बोलला, ‘उदया तू त्या व्यापाऱ्याकडे एक आरसा घेऊन जा, आणि त्याला सांग की तुझा खरा चेहरा घेऊन आलो आहे. चांगल्या प्रकारे मिळतो का बघून घे. थोडा पण फरक जाणवणार नाही. बस, मग काय तुझे काम झाले म्हणून समज.’ दुसऱ्या दिवशी चित्रकाराने तसेच केले.

तो आरसा घेऊन व्यापाऱ्याकडे पोहोचला आणि त्याच्या समोर आरसा ठेवला. ‘हे घ्या शेठजी तुमचे योग्य चित्र बनवून आणले आहे, यात जरापण चूक होणे शक्य नाही.’ चित्रकार आपले हसू सावरत बोलला.
‘परंतु हा तर आरसा आहे.’ व्यापारी गोंधळून बोलला.
‘तुमचा खरा चेहरा आरशा व्यतिरिक्त कोणीच बनवू शकत नाही. लवकरात लवकर माझ्या चित्रांचे मूल्य मला दया.’ चित्रकार बोलला.

व्यापाऱ्याला समजले की, हे सर्व तेनालीरामच्या हुशारीचा परिणाम आहे. त्याने लगेचच एक हजार सुवर्णमुद्रा चित्रकाराला दिल्या. ”


तेनालीरामचे चातुर्य

एक दिवस राजा कृष्णदेवराय कोणत्या एका कारणामुळे तेनालीरामवर नाराज झाले होते व रागात येऊन त्यांनी भरलेल्या दरबारात तेनालीरामला सांगितले उदयापासून मला दरबारात तुझे तोंड दाखवू नको. त्यावेळी तेनालीराम दरबारातून बाहेर निघून गेला.
दुसऱ्या दिवशी जेव्हा महाराज दरबाराजवळ येत होते तेव्हा एका चुगलीखोराने त्यांना हे सांगून भडकविले की, तेनालीराम तुमच्या आदेशाचे पालन न करता दरबारात उपस्थित आहेत. हे ऐकून महाराज भयंकर चिडले. तो चुगलखोर दरबारी पुढे बोलला – तुम्ही स्पष्ट सांगितले होते की दरबारात आल्यानंतर चाबकाचे फटके मिळतील याची पण त्यांनी पर्वा केली नाही. आता तर तेनालीराम आपल्या आदेशाचे पालन करणे शक्यच नाही.

राजा दरबारात आला. त्यांनी बघितले की डोक्यात मातीचा एक माठ घालून तेनालीराम काहीतरी विचित्र हावभाव करत आहे. त्या माठाचा चारी बाजूला प्राण्यांच्या तोंडाचे चित्र बनलेले होते.‘तेनालीराम हा काय मुर्खपणा चालविला आहे, तू माझ्या आज्ञेचे पालन केलेले नाही. महाराज पुढे बोलले की, शिक्षा म्हणून चाबकाचे फटके खायला तयार रहा.’

‘मी कोणत्या आज्ञेचे पालन केले नाही महाराज?’ माठात तोंड लपवून तेनालीराम बोलला – ‘तुम्ही बोलला होतात की, उदया मला दरबारात तुझे तोंड दाखवू नकोस, तुम्हाला माझे तोंड दिसते आहे का?’

हे देवा! कुभांराने मला फुटलेला माठ तर नाही ना दिला.

हे ऐकताच महाराजांना हसू आले व ते बोलले – तुझ्यासारख्या बुध्दिमान आणि हजरजबाबी बरोबर कोणी नाराज होऊच शकत नाही. आता हा मातीचा माठ डोक्यावरून काढ व आपल्या जागेवर आसनस्थ हो. ”

Tenali Raman Stories In Marathi


किती कावळे आहेत ?

एक दिवस कृष्णदेव राय राजाने तेनालीरामला विचारले ‘तेनालीराम तू सांगू शकतो का? आपल्या राज्यात एकूण किती कावळे आहेत ते?’

‘हो, मी सांगू शकतो, महाराज.’ तेनालीराम तात्काळ बोलला.

‘पण मला अचूक नंबर पाहिजे.’ राजा बोलला.

‘हो महाराज, मी अचूक नंबरच सांगेन’ तेनालीराम ने उत्तर दिले.

‘जर तू मला अचूक नंबर सागण्यास नापास झाला, तर तुला फाशीची शिक्षा दिली जाईल.’ राजा हसत बोलला.
‘मी तुमचे आव्हान स्वीकारतो, महाराज.’ तेनालीराम निर्भयपणे बोलला.

दरबारी कल्पना करत होते की तेनालीराम आता मोठया संकटात सापडणार आहे, त्यांना खात्री होती की पक्षी मोजणे हि अशक्य गोष्ट आहे.
‘ठिक आहे! मी तुला दोन दिवसांचा वेळ देत आहे. तिसऱ्या दिवशी तुला सांगावे लागेल कि आपल्या राज्यात एकूण किती कावळे आहेत?’ राजा बोलला.

तिसऱ्या दिवशी तेनालीराम दरबारात आला. राजाने त्याच्याकडे बघितले आणि विचारले, ‘आपल्या राज्यात एकूण किती कावळे आहेत ते तू मोजले का?’

तेनालीराम आपल्या जागेवरून उठला आणि बोलला, ‘महाराज! आपल्या राज्यात एकूण एक लाख पन्नास हजार नऊशे नव्यान्नव कावळे आहेत.’

‘हे खरे आहे का?’ राजाने विचारले.

‘महाराज शंका असल्यास मोजून घ्या.’ तेनालीराम बोलला.
‘पुर्नमोजणी केल्यानंतर संख्या कमी – जास्त असली तर’? राजा बोलला.

‘महाराज! मी सांगितलेल्या संख्येमध्ये फरक आढळल्यास त्यामागे निश्चितच काहीतरी कारण असेल.’ तेनालीराम बोलला.
राजाने विचारले, ‘काय कारण असू शकते?’

तेनालीरामने उत्तर दिले, ‘जर राज्यातील कावळयांची संख्या वाढली तर त्यामागील कारण आहे की कावळयांचे काही नातेवाईक व मित्रमंडळी त्यांना भेटायला आले आहेत. पण जर राज्यातील कावळयांची संख्या कमी झाली तर आपल्या राज्यातील काही कावळे हे त्यांच्या नातेवाईकांकडे व मित्रांना भेटायला गेले आहेत. अन्यथा मी सांगितलेली कावळयांची संख्या पूर्णपणे बरोबर आहे.’
राजाकडे काही उत्तर नव्हते.

तेनालीरामवर जळणारे बाकीचे दरबारी मनातल्या मनात विचार करत होते की नेहमीप्रमाणे तेनालीराम हा आपल्या चातुर्याने अवघड परिस्थितीतून बाहेर निघाला.

राजाने तेनालीरामला त्याच्या व्यवहार चातुर्याबद्दल बक्षिस दिले.”

हे पण वाचा
अकबर बिरबल मराठी कथा
पंचतंत्र मराठी कथा
दोन सापांची पंचतंत्र कथा
हत्ती आणि सशाची पंचतंत्र कथा
राजा आणि मूर्ख माकड पंचतंत्र कथा


जादूची विहीर-तेनाली राम मराठी कथा

एकदा राजा कृष्णदेवरायने गृहमंत्र्यानां राज्यात खूप विहीरी बनविण्याचा आदेश दिला. उन्हाळा जवळ येत होता त्यामुळे राजाची अशी इच्छा होती की विहीरी लवकरात लवकर खोदल्या जाव्यात त्यामुळे राज्यातील लोकांना उन्हाळयात आराम मिळू शकतो.

गृहमंत्रींनी हया कामासाठी राज्याच्या तिजोरीतून खूप सारे धन घेतले, लवकरच राजाचा आदेशाप्रमाणे राज्यात विहीरी खोदल्या गेल्या. यानंतर राजाने एक दिवस राज्यात फेरफटका मारला व स्वतः काही विहीरीचे निरीक्षण केले व आपल्या आदेशाचे पालन पूर्ण झालेले बघून ते समाधानी झाले.

उन्हाळयाच्या एक दिवशी राज्याच्या बाहेर गावातील काही लोक तेनालीरामाकडे गेले, व ते सर्व गृहमंत्र्यांविरूध्द तक्रार घेऊन आलेले होते. तेनालीरामने त्या सर्वांची तक्रार ऐकून घेतली व त्यांना न्याय मिळविण्याचा मार्ग सांगितला.
दुसऱ्या दिवशी तेनालीराम राजाला भेटला व बोलला, ‘महाराज मला राज्यात काही चोर असल्याची माहिती मिळाली आहे, व ते आपल्या विहीरी चोरत आहेत.’

यावर राजा बोलला, ‘काय बोलत आहेस, तेनाली! कोणी चोर विहीर कसे काय चोरू शकतो?

‘महाराज हि गोष्ट आश्चर्यकारक जरूर आहे पण खरी आहे त्या चोरांनी आत्तापर्यंत बऱ्याच विहीरी चोरल्या आहेत.’ तेनालीराम शात स्वरात बोलला.

तेनालीरामचे हे बोलणे ऐकून दरबारातील सर्व उपस्थित दरबारी हसायला लागले.

महाराज बोलले ‘तेनालीराम तुझी तब्येत तर ठीक आहे ना? तू आज असे काहीपण काय बोलत आहेस? तुझ्या बोलण्यावर कोणीच व्यक्ती विश्वास ठेवू शकणार नाही.’

‘महाराज मला माहिती आहे की तुम्ही माझ्या बोलण्यावर विश्वास नाही ठेवणार, त्यामुळे काही गावकऱ्यांना माझ्या सोबत घेऊन आलो आहे. ते सर्व बाहेरच उभे आहेत. जर तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर तुम्ही त्यांना दरबारात बोलवून विचारू शकता, ते तुम्हाला सर्व काही सविस्तर सांगतील.’

राजाने बाहेर उभ्या असलेल्या सर्व गावकऱ्यांना दरबारात बोलविले. त्यातला एक जण बोलला ‘महाराज गृहमंत्र्यांव्दारा बनविल्या गेलेल्या सर्व विहीरी गायब होत आहेत, तुम्ही प्रत्यक्ष बघु शकता.’

राजाने त्यांचे बोलणे ऐकले व लगेचच गृहमंत्री, तेनालीराम व काही गावकऱ्यांना बरोबर घेऊन विहीरीचे निरिक्षण करायला गेले. पूर्ण राज्याचे निरीक्षण केल्यानंतर त्याला असे जाणवले की राज्याच्या आसपास, गावातील अन्य ठिकाणी एकही विहीर नाही. राजाला हे समजल्याचे बघून गृहमंत्री घाबरला. सत्य स्थितीत त्याने फक्त काही विहीरी बनविण्याचे आदेश दिले होते व उरलेला सर्व पैसा त्याने आपल्या सुख सुविधासाठी ठेवून घेतला.

आत्तापर्यंत राजाला तेनालीरामाच्या बोलण्याचा अर्थ समजलेला होता. ते गृहमंत्र्यांवर रागवायला लागले, तेव्हा तेनालीराम मध्येच बोलला ‘महाराज, या सर्वामध्ये याची काहीही चूक नाही. वास्तवमध्ये सर्व विहीरी या जादूच्या होत्या ज्या बनल्यानंतर काही दिवसातच गायब झाल्या.’

आपले बोलणे संपवल्यानंतर तेनालीरामने गृहमंत्र्यांकडे बघितले, गृहमंत्र्याला आपण केलल्या कृत्याची लाज वाटली व त्याने आपली मान शरमेने खाली घातली.

त्यानंतर राजाने गृहमंत्र्याला फटकारले व नव्याने विहीरी बनविण्याचा आदेश दिला. हया कार्याची सर्व जबाबदारी तेनालीरामवर सोपविण्यात आली. ”

Tenali Raman Stories In Marathi


जास्त चतुर कोण ?

एक दिवस, बोलता बोलता राजा कृष्णदेव रायने तेनालीरामला विचारले ‘कोणत्या प्रकारचे लोक सगळयात जास्त मुर्ख असतात आणि कोणत्या प्रकारचे लोक अधिक चतुर असतात?’

तेनालीरामने त्वरीत उत्तर दिले ‘ब्राम्हण हे सगळयात जास्त मुर्ख असतात व व्यापारी हे सगळयात जास्त चतुर असतात.’
‘हे तू काय बोलत आहेस, तेनालीराम? ब्राम्हण हे उच्चशिक्षित व ज्ञानी असतात. तू व्यापाऱ्यांची ब्राम्हणांबरोबर तुलना कशी करू शकतो?’ राजा बोलला.

‘महाराज! मी माझा मुद्दा पटवून देऊ शकतो.’ तेनालीराम बोलला.
‘कसे?’ राजाने विचारले.

‘मी उदया राजदरबारात सर्वांसमक्ष पटवून देईल.’

दुसऱ्या दिवशी जेव्हा राजदरबार पूर्ण भरलेला होता, तेव्हा तेनालीराम बोलला आपल्या अध्यात्मिक गुरूंना बोलवावे. राजगुरू आल्यावर तेनालीराम बोलला ‘मी हे आत्ता सिध्द करून दाखवेल महाराज, परंतु तुम्ही या कामात लक्ष देणार नाही असे मला वचन दया तेव्हा मी कामास सुरूवात करेन.’

राजाने तेनालीरामचे म्हणणे मान्य केले. तेनालीरामने आदरपूर्वक गुरूंना विचारले ‘राजगुरू, महाराजांना तुमच्या शेंडीची आवश्यकता आहे, याबद्दल तुम्हाला तुम्ही मागाल ते बक्षिस मिळेल.’

राजगुरूंनी विचार केला की इतक्या वर्षापासून जपलेली शेंडी कशी कापून दयावी? परंतु राजाची आज्ञा कशी टाळू शकतो. त्यांनी सांगितले ‘तेनालीरामजी, मी शेंडी कशी देऊ शकतो.’

तेनालीराम बोलला ‘राजगुरूजी, आपण आजन्म महाराजांचे मीठ खात आहात. शेंडी अशी वस्तु तर नाही ना, जी परत येऊ शकत नाही, आणि महाराज आपण मागाल ते बक्षिस दयायला पण तयार आहेत.’ राजगुरूंना मनातल्या मनात समजले की हा तेनालीरामचा काही तरी डाव आहे.

तेनालीरामने विचारले ‘राजगुरूजी, आपल्याला शेंडीच्या बदल्यात काय बक्षिस पाहिजे?’
राजगुरूंने सांगितले की ‘पाच सुवर्ण मुद्रा खूप होतील.’

पाच सुवर्णमुद्रा राजगुरूंना दिल्या गेल्या आणि केशकर्तन करणाऱ्याला बोलवून राजगुरूंची शेंडी कापण्यात आली.
आता तेनालीरामने राज्यातील सर्वात प्रसिध्द व्यापाराला बोलविले.

तेनालीरामने व्यापाराला सांगितले ‘महाराजांना तुमच्या शेंडीची गरज आहे.’
‘सर्व काही महाराजांचेच आहे, जेव्हा पाहिजे तेव्हा घेऊ शकतात. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, की मी एक गरीब माणूस आहे.’ व्यापारी बोलला.

‘तुम्हाला तुमच्या शेंडीची मागाल ती किंमत दिली जाईल.’ तेनालीराम बोलला.
‘सर्वकाही तुमची कृपा आहे परंतु….’ व्यापारी बोलला.
‘तू काय बोलू इच्छितो?’ तेनालीरामने विचारले.

‘खरे तर, या शेंडीमुळे मी सर्व काही व्यवस्थापित करू शकतो. माझ्या मुलीचा विवाह केला होता तेव्हा मी माझ्या शेंडीची प्रतिष्ठा ठेवण्यासाठी पूर्ण पाच हजार सुवर्णमुद्रा खर्च केल्या होत्या. मागच्या वर्षी माझ्या वडिलांचा मृत्यू झाला, तेव्हापण याच कारणामुळे पाच हजार सुवर्णमुद्रा खर्च केल्या होत्या. माझ्या या गोंडस शेंडीमुळे बाजारात जेव्हा मला गरज पडेल तेव्हा कमीत कमी दहा ते बारा हजार सुवर्ण मुद्रा उधार मिळतात.’ आपल्या शेंडीवर हात फिरवत व्यापारी बोलला.

‘या प्रकारे तुमच्या शेंडीची किंमत पंधरा हजार सुवर्ण मुद्रा झाली आहे. ठिक आहे! तुला तुझी ही किंमत दिली जाईल.’
पंधरा हजार सुवर्णमुद्रा व्यापाराला दिल्या गेल्या व व्यापारी शेंडी कापण्यासाठी बसला. जसे न्हाव्याने शेंडीजवळ वस्तारा नेला, व्यापारी जोरात बोलला ‘सांभाळून न्हाव्या, तुला माहित नाही का ही महाराज कृष्णदेवराय यांची शेंडी आहे ते.’हे ऐकून राज चिडला व बोलला, ‘या व्यापाऱ्याची इतकी हिंमत की तो माझा अपमान करतो? त्याला धक्के मारून दरबारातून काढून टाका.’
व्यापारी पंधरा हजार सुवर्ण मुद्रांची थैली घेऊन तिथून निघून गेला.

काही वेळानंतर तेनालीराम बोलला, ‘आपण बघतले का महाराज, राजगुरूंनी पाच सुवर्णमुद्रा घेवून आपली शेंडी कापून दिली व व्यापारी पंधरा हजार सुवर्णमुद्रा घेवून गेला त्याचबरोबर आपली शेंडीही वाचवून घेऊन गेला. तुम्हीच सांगा, ब्राम्हण चतुर की व्यापारी?’
राजा बोलला ‘तू योग्य सांगितले होते, की व्यापारी चतुर असतात.’ ”

तेनाली राम मराठी कथा


सोन्याचे आंबे- तेनाली राम मराठी कथा

राजा कृष्णदेवराय यांची आई गंभीरपणे आजारी पडली.

वृध्दापकाळामुळे आणि शारीरीक व्याधीमुळे राज्यात उपलब्ध असलेल्या चांगल्यात चांगल्या औषधांना ती प्रतिसाद देत नव्हती. जेव्हा ती मृत्यूशय्येवर होती तेव्हा तिने, ‘ब्राम्हणांना आंबे दान करावेत अशी इच्छा व्यक्त केली होती.’ ती असे समजत होती की, अशा प्रकारचे दान केल्याने तिला स्वर्ग प्राप्त होईल पण काही दिवसातच आपली इच्छा पूर्ण न करता तिचा मृत्यू झाला.

तिची इच्छा अपूर्ण राहण्या मागचे कारण म्हणजे तो आंब्याचा हंगाम नव्हता. संपूर्ण राज्य महाराजांच्या आईच्या मृत्यूमुळे दुःखात बुडाले होते.

राजाला अत्यंत वाईट वाटत होते, की तो आपल्या आईची इतकी साधी आणि शेवटची इच्छा पण पूर्ण करू शकला नाही. त्याला काळजी वाटत होती की जो पर्यंत आपल्या आईची शेवटची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तिच्या आत्म्याला शांती मिळणार नाही.

त्यानंतर राजाने राज्यातील सर्व विद्वान ब्राम्हणांना बोलविले आणि आपल्या आईच्या शेवटच्या इच्छेबद्दल सांगितले.
त्यावर काही वेळ शांत राहून ब्राम्हण बोलले, ‘महाराज! हे तर खूपच वाईट झाले. शेवटची इच्छा पूर्ण नाही झाली तर त्यांना मुक्ती मिळणार नाही व त्यांचा आत्मा भटकत राहील. महाराज तुम्हाला त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी उपाय करावा लागेल.’
तेव्हा महाराजांनी आईची अंतिम इच्छा पूर्ण करण्याचा उपाय विचारला.

ब्राम्हण बोलले ‘त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तुम्ही त्यांच्या पुण्यतीथीला सोन्याचे आंबे ब्राम्हणांना दान करा.’

राजा या गोष्टीला सहजपणे तयार झाला. व आईच्या पुण्यतिथीला काही ब्राम्हणांना भोजनासाठी बोलविले आणि प्रत्येकाला एक सोन्याचा आंबा दान म्हणून दिला. जेव्हा हे तेनालीरामला समजले तेव्हा त्याच्या लगेच लक्षात आले की, ब्राम्हण लोक हे राजाच्या भोळेपणा व साधेपणाचा फायदा घेत आहेत. त्यामुळे त्याने ब्राम्हणांना धडा शिकवण्यासाठी योजना तयार केली.

काही काळानंतर तेनालीरामने ब्राम्हणांना निमंत्रण पाठविले, त्यात लिहिले होते की तेनालीराम पण आपल्या आईच्या पुण्यतिथिला दान करू इच्छित आहे कारण त्यांच्या आईची पण मृत्यूआधी एक अपूर्ण इच्छा राहिली होती. जेव्हापासून त्याला माहिती पडले आहे की आपल्या आईची इच्छा पूर्ण न झाल्यामुळे आपल्या आईचा आत्मा भटकत असेल त्यामुळे तो खूप दुःखी होता व लवकरात लवकर आपल्या आईच्या आत्म्याला शांती मिळावी असे त्याला वाटत होते. ब्राम्हणाने विचार केला की तेनालीरामच्या घरीपण आपल्याला खूप जास्त दान मिळेल कारण तो एक राजदरबारातील श्रीमंत माणूस आहे.

सर्व ब्राम्हण ठरलेल्या दिवशी तेनालीरामच्या घरी पोहोचले. तेव्हा तेनालीराम त्यांची वाटच बघत होता. ते ब्राम्हण आसनस्थ झाल्यावर तेनालीरामने सर्व दारे व खिडक्या बंद केल्या.

‘कृपया, थोडा वेळ प्रतिक्षा करा. मी काही तयारी करत आहे.’ असे बोलत तेनालीरामने काही लोखंडाच्या सळया आगीत ठेवल्या आणि त्यांना गरम करण्यास सुरूवात केली.

पुरोहित व ब्राम्हण काकुळतीने बघत होते. त्यांना काही तरी विचित्र वाटत होते. त्यांना अशी अपेक्षा होती की तेनालीराम आपल्याला स्वादिष्ट भोजन आणि योग्य ते मानधन देईल. पण, तिथे असे काहीही चिन्ह दिसत नव्हते. खूप वेळ वाट बघितल्यानंतर त्यांचा धीर सुटत चालला होता. त्यांच्यातील एक ब्राम्हण बोलला ‘तेनालीराम, तुझा उद्देश समजून घेण्यासाठी आम्ही अपयशी ठरलो आहोत तू आम्हाला तुझ्या आईच्या पुण्यतिथिला संस्कार करण्यासाठी बोलविले आहे. आम्ही कधीचे निष्क्रिय बसलेलो आहोत, आणि तू लोखंडी सळया गरम करीत आहेस. याचे आणि संस्काराचे काही संबध नाही.’

‘नाही, याचा संबंध आहे.’ तेनालीराम बोलला माझी आई संधिवाताच्या आजाराने त्रस्त होती जेव्हा ती मृत्यूशय्येवर होती. ती खूप दुःख सहन करत होती. ती मला म्हणायची ‘की लोखंडी सळई गरम करून दुखण्याच्या जागेवर लाव.’ त्यामुळे तिला खरोखरच आराम वाटायचा.

एक दिवस, तिच्या शेवटच्या दिवशी तिला संधीवाताचे बरेच झटके आले आणि तिने मला लोखंडी सळई गरम करून देण्यास सांगितली. मी सळई गरम करायला ठेवली आणि गरम सळई तिला देण्याच्या आधी तिने प्राण सोडले. मला अतिशय वाईट वाटले की मी तिची शेवटची इच्छा पूर्ण करू शकलो नाही, तिचा आत्मा पृथ्वीवर नेहमी भटकत राहिल. तो मुक्त करणे आवश्यक आहे. मला खात्री आहे, की या गरम सळया तुमच्या सर्वांच्या शरीरावर लावल्यानंतर नक्कीच तिला आराम मिळेल व तिचा आत्मा मुक्त होईल.
सर्व ब्राम्हण खूप नाराज झाले व मृत्यूला घाबरायला लागले.

शेवटी ब्राम्हण बोलले ‘तेनालीराम तू एक अतिशय हुशार व्यक्ती आहेस. तू अशी अपेक्षा कशी करू शकतोस की आमच्या शरीरावर गरम केलल्या लोखंडी सळया लावल्याने तुझ्या आईच्या आत्म्याला मुक्ती मिळेल? या सिध्दांताला काही आधार नाही.’

या सिध्दांताला आधार कसा नाही? तेनालीराम थोडया रागात बोलला. ‘जर राजाच्या आईच्या आत्म्याला तुम्ही सर्वांनी सोन्याचे आंबे घेवून मुक्ती मिळू शकते, तर माझ्या आईच्या आत्म्याला तुम्ही गरम केलेल्या सळयांचे डाग लावून घेतल्याने मुक्ती का मिळू शकत नाही?’
आंब्याचे दान देणे ही राजाच्या आईची शेवटची इच्छा होती, तसेच लोखंडाच्या सळयांचे डाग घेणे ही माझ्या आईची शेवटची इच्छा होती. हाच तो फरक. पण दोघांमध्ये एकच साम्य आहे, ते म्हणजे आत्म्याची मुक्तता.
हे ऐकून ब्राम्हण खूप नाराज झाले.

तेनालीराम ब्राम्हणांना बोलला ‘यावरून तुम्हाला धडा मिळालाच असेल. जर तुम्हाला तुमच्या कृतीची जाणीव झाली असेल तर, तुम्ही राजांकडे जावे व त्यांच्याकडून घेतलेले सोन्याचे आंबे त्यांना परत करावे व त्यांची माफी मागावी.’

जेव्हा ते ब्राम्हण राजाकडे आंबे घेवून गेले व त्यांनी घडलेला सर्व प्रकार राजाला सांगितला व माफी मागितली. राजाने तात्काळ तेनालीरामला बोलविणे पाठविले.

‘तू असे का केले?’ राजाने विचारले.
महाराज, हे ब्राम्हण तुमच्याविषयी निष्ठावंत नाही त्यांनी तुमची फसगत केली आहे. जेव्हा ते राजाची फसवणूक करू शकतात, तेव्हा ते तुमच्या राज्यातील सर्वसामान्य व्यक्तींचीपण फसवणूक करू शकतात. मी हे असे फक्त त्यांना धडा शिकविण्यासाठी केले. मला फक्त त्यांचे हृदय परिवर्तन करायचे होते.

राजा म्हणाला, ‘तेनालीराम जे बोलला ते योग्य आहे. मी त्याच्याशी सहमत आहे.’

त्यानंतर राजाने ब्राम्हणांना सोन्याचे आंबे परत केले. राजा एकदा दिलेल्या वस्तु परत घेत नाही. परंतु भविष्यात कोणाचीही फसगत करू नका व लोभी बनू नका अशी सुचना ब्राम्हणांना केली.

राजाने तेनालीरामला त्यांचे डोळे उघडल्याबद्दल बक्षिस दिले. ”


मित्रांनो हि -Tenali Raman Stories In Marathi || तेनाली राम मराठी कथा  जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद

Leave a Comment